नाजूका भाग - १

आज वाड्याच्या शाळेत नवीन मास्तर येणार होते.
जुन्या मास्तरची बदली दुसऱ्या गावाला झाली होती.
जिल्हापरिषदची चवथीपर्यंतची शाळा.
गावापासून जरा लांबच होती. आजूबाजूला गर्द झाडे आणि मध्ये छोटीशी शाळा. शाळेजवळच एक  एस.टी. स्टॕण्ड .ते पण छोटेच. गावच छोटे.त्या गावात येणेजाणे तरी कोण करणार?  सामानसुमान आणायचे असेल किंवा दवाखान्यात जायचे असेल तरच त्या एस.टी.ची गरज.उगाच  तिकिटवर पाच रुपये कोण खर्च करणार?
शाळेत मुले कमीच राहायची. शाळेत जाऊन मुलांचे खूप काही भले होते हे मत कालबाह्य वाटावे अशीच त्या शाळेची परिस्थिती. मास्तरला घरोघरी जाऊन  पोरांना शाळेत या म्हणून विनवणी करावी लागायची.
पण तरीही मास्तरला खूप मान द्यायचे सगळे.
मुलाला एकदा शाळेत टाकले कि त्या मुलावर हक्क मास्तरचा. मास्तर म्हणजे शाळेचे सर्वेसर्वा.
जुन्या मास्तरची पाच वर्षांनी बदली झाली होती.
दोनेक महिन्यानंतर गावाला नविन मास्तर मिळाले होते.
पंधरा,सोळा वर्षाची नुकतीच यौवनात पदार्पण केलेली नाजूका  रोज शाळेची साफसफाई करायला यायची.
चवथीपर्यंत ती याच शाळेत शिकली होती.

जुने म्हणजे बदलून गेलेले मास्तर शाळेच्या बाजूलाच खोली घेऊन राहायचे.नविन आलेल्या मास्तरांनाही तिथेच ठेवायचे असे ठरले होते.
मास्तर पहिल्यांदाच गावाला येणार म्हणून
सरपंचाने शाळेकडे फेरफटका मारला. नाजुका शाळेचे अंगण झाडत होती.
सरपंच लांबूनच ओरडले,

नाजुका ती बाजुची खोलीही स्वच्छ कर.नविन मास्तर येणार हायेत आज. जरा त्यांच्या जेवणाचेही बघ.

हो मालक.

खालची मान वर न करता नाजुकाने उत्तर दिले.
नाजुकाने मास्तरची खोली एकदम चकाचक केली. वांगे चूलीवर भाजून झणझणीत भरीत बनवले.
भांडी घासून पुसून ठेवली.ती निघणार तेवढ्यात सदाभाऊ बरोबर एक मनुष्य येतांना दिसला.त्याचे सामान सदाभाऊने पकडले होते. हे नविन मास्तरच असणार नाजुकाने लगेच ओळखले.
सदाभाऊने मास्तरचे सामान खोलीत ठेवले.नाजुकाला सांगितले नाजुका हे नविन मास्तर बरे का.नीट बडदास्त ठेवायची.नाजुकाने मान हलवली.
मग मास्तरकडे वळून म्हणाले,

'मास्तर ही आमची नाजुका तुम्हाला काही लागलंसवरलं तर हिलाच सांगायचं.'

एवढे बोलून सदाभाऊ निघून गेले.
नाजूकाने लगेच गरम गरम भाकरी भाजून दिली.मास्तर जेवणावर खूष झाले. नाजुकाच्या हाताला चव होतीच.जुने मास्तरपण तिची तारीफ करायचे.
पटपट सगळे आवरुन ती निघून गेली.शाळा जरा गावापासून लांब असल्यामूळे आई तिला घरी लवकर यायला सांगायची.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ती शाळेत आली.शाळेची साफसफाई करुन मास्तरांच्या खोलीकडे गेली.आधी मास्तरांना चहा करुन दिला.मग खोलीची साफसफाई नंतर  स्वयंपाक हा आधीच्या मास्तपासूनचा दिनक्रम होता.शाळेत येतायेताच सोबत भाजी घेऊन आली होती. चपळतेने सर्व कामे करत होती.
मास्तरांनी विचारले,

नाजुका घरी कोण कोण आहे तुझ्या ?

मी,आई आणि दोन धाकटी भावंड.

वडील काय करतात?

वडील नाही मास्तर मला. दोन वरीस झाले..विहीर खणतांना गेले.

अरेरे.
मास्तर चुकचुकले.

आणि तुझी भावंडे ?

ती याच शाळेत आहेत.

नाजुका सगळे आवरुन परत गेली.
नुकतीच यौवनात आलेली नाजुका,तिची चपळता. काम करतांना होणाऱ्या तिच्या मोहक हालचाली या सगळ्यांवरच मास्तर मोहीत झाले.
मास्तर पस्तिशीतले.घरी आई-वडील,बायको अन् पाच वर्षाचा मुलगा.
मास्तरला येऊन सहा महिने झाले होते. मध्ये मध्ये ते त्यांच्या गावी जाऊन येत होते.
नाजुका दररोज ठरल्या वेळी येत होती आणि सर्व आटपून जात होती.ती आली कि मास्तरची तिच्या वर खिळलेली नजर जाणवायची तिला. मास्तर खूप  आपलेपणा दाखवायचे तिला.खेड्यातली पंधरा,सोळा वर्षाची अवखळ  पोर ती. गाव सोडून कधीही बाहेर न गेलेली तिला चांगल्यावाईटाची काय पारख राहणार?
तीही हळूहळू मास्तरच्या मोहपाशात गुंतत गेली.
मनाबरोबर शरीरही गुंतले. 
गावासाठी मास्तर देवमाणूस,शाळा गावाबाहेर त्यामुळे  कुणाला संशय यायला जागाच नव्हती.
एक दिवस नाजुकाने मास्तरला विचारले.

मास्तर गावाकडे कोणकोण असते ?

मास्तरांनी सांगितले,
आई-वडील.
नाजुकाने भाबडेपणाने विश्वास ठेवला त्यांच्यावर.
मास्तरचे लग्न झाले नाही या भ्रमात राहिली.
मास्तर आपल्याला त्यांच्या गावाला नेणार ही वेडी आशा त्या पोरीला वाटायला लागली.
मास्तरला आता वर्ष व्हायला आले होते.
नाजुकाच्या आईच्या  लक्षात नाजुकात झालेला बदल यायला वेळ लागला नाही.
नाजुकाला दिवस गेले होते.
नाजुकाची आई घाबरली.पण नाजुका आनंदली.तिचा मास्तरवर पूर्ण विश्वास होता.
आईने तिला हे मास्तरला सांगायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी नाजुका मास्तरकडे कामाला आली.मास्तरला म्हणाली,

मास्तर एक लय आनंदाची बातमी हाय.

मास्तर-कोणती?
नाजुकाने उत्तर दिले,
तुमी बाप बननार.
मास्तरच्या पायाखालची जमीन सरकली.
थोडा वेळ वाचा गेल्यासारखे बसून राहिले.
नंतर नाजुकाला म्हणाले,

'तू कुणाला सांगितले नाही नं .'

तिने आईला माहित असल्याचे सांगितले.
मास्तर घाबरले पण नाजुकाला जाणवू दिले नाही.
कामे आटोपल्यावर नाजुकाने विचारले,

'मग आईला काय सांगू ?कधी नेणार तुमच्या गावी?
कधी लग्न करायचे आपण?'

मास्तर आवंढा गिळून म्हणाले,
'नेईन  लवकरच.

नाजुका एवढ्यावरच खूष झाली.
घरी येऊन आईला तिने तसे सांगितले.नाजुका सारखाच आईने पण विश्वास ठेवला मास्तरवर.
नाजुकाला आता दोन महिने झाले होते.
मास्तरला ती विचारत राहायची.मास्तर तिला टाळण्यासाठी काहीतरी उत्तरे देत राहायचे.
साध्या नाजुकाला मास्तरवर संशय येणे शक्यच नव्हते.
पण आता नाजुकाच्या आईला काळजी वाटायला लागली.नाजुकाला बोलली ती,

नाजुका पुढच्या आठवड्यात मी येईन मास्तरला भेटायला.

तिने मास्तरला तसे सांगितलं.
मध्ये दोन तीन दिवस ती तब्येत बरी नसल्यामूळे कामाला आली नाही. तिसऱ्या दिवशी कामाला येतांना तिला सदाभाऊ भेटले.
'नाजुका कुठे  निघालीस?
नाजुका बोलली,
'शाळा आणि  मास्तरकडे काम कराया.

सदाभाऊ बोलले
मास्तर तर परवाच गेले.दुसऱ्या गावाला बदली करवून घेतली त्यांनी.

नाजूकाचा सदाभाऊवर विश्वास बसला नाही.
सदाभाऊ काय बी गम्मत नका करु.

अग खरेच बोलतोय मी.

तरीही तिला ती मस्करीच वाटली.ती आधी शाळेत गेली.तिथले अंगण झाडून मास्तरच्या खोलीकडे आली.खोलीचे दार सताड उघडे होते.
ती आत गेली. खोली रिकामी होती.
एक पत्र दिसले फक्त. चुकून खोलीत राहलेले.
तिने बघितले..गावावरुन आले होते.नाजुकाने वाचायला घेतले

प्रिय मास्तर.
आपल्याला मुलगी झाली. ह्यावेळेस तुमच्या मनासारखे झाले.

नाजुकाच्या डोळ्यापुढे अंधारी आली.पत्र हातात पकडूनच ती खाली कोसळली.


क्रमशः ..... नाजूका भाग २ची लिंक
http://gajbhiyepreeti72.blogspot.com/2020/09/blog-post_15.html


Comments

  1. अरे वाह, यावेळेस जरा वेगळीच कथा,
    छानच, पुढे काय होणार, प्रतीक्षेत
    ........मोहिनी

    ReplyDelete
  2. कथेची मांडणी खूप सुंदर आहे सत्य परिस्थिती दर्शवली

    ReplyDelete
  3. खूप छान कथा, पुढील भागासाठी खूप उत्सुकता वाटते आहे,हेच लिखाणाचे यश,
    माधुरी

    ReplyDelete
  4. अतिशय सुरेख लिखाण नाजूका पात्र खुप सुंदर लिहिले आहेस.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

आरसा मनाचा

शब्दपर्ण