शलाकाची डायरी.....

दिनांक .......
बाबा घरीच जास्त रमायचे. बँकेतून घरी आले कि झाडांना पाणी दे,आमचा दिवस कसा गेला त्याची विचारपूस कर,आईला बँकेतल्या गोष्टी सांग यातच वेळ घालवायचे. बाबांना फिरण्याचीही आवड होती.सगळे मिळून कुठेतरी फिरायला जावे असे त्यांना सतत वाटायचे.पण आईची इच्छा नसायची.आईला विशेष अशी कसलीही आवड नव्हती. स्वयंपाक आणि  घर टापटीप ठेवणे हीच तिची आवडती कामे. पण बरेचदा तिला न आवडणाऱ्या  गोष्टी ती केवळ बाबांना आवडतात म्हणून करायची. बाबा आईला सिनेमाला,नाटक बघायला घेऊन जायचे. घरी आले की आम्हाला समरसून कथानक ऐकवायचे. खूप तद्रुपतेने सांगायचे सगळे. त्यांनी सांगितलेले चित्रवत् डोळ्यासमोर उभे राहायचे.
बाबांच्या स्वभावात ओलावा तर आई जरा कोरडी होती. कित्येकदा बाबा आईला काही सांगायचे तिकडेही तिचे लक्ष  नसायचे. बाबा आम्हाला कधीही रागवायचे नाहीत.
मी चवथीत असतांना घरी टेपरेकॉर्डर आल्याचे आठवते. बाबा त्यांच्या आवडीच्या गाण्यांची लिस्ट बनवायचे आणि  गाणी रेकाॕर्ड करुन आणायचे. किती छान दिवस होते ते. आम्ही जेवण मिळून करायचो.सकाळी आमची शाळेची तयारी करण्यात बाबा आईला मदत करायचे. घरी नातेवाईक,बाबांचे मित्र येत राहायचे.घर भरलेलं,नांदतं वाटायचे. घरात शिरले कि प्रसन्न वाटायचे.
पण आता अलिकडे आईबाबांमध्ये काहीतरी धुसफूस चालायची. दोघांच्या  भांडणांचा आवाज यायचा. याआधी आम्ही आईबाबांना कधीही भांडतांना बघितले नव्हते.   नेहमी वेळेवर घरी येणारे बाबा   आता उशिरा  यायचे. आम्ही जेवणासाठी ताटळत राहायचो.आणि  घरी आल्यावरही त्यांचे चित्त थाऱ्यावर नसायचे. नजर हरवलेली असायची. आमच्याकडेही कमीच लक्ष द्यायचे बाबा. मी विचारायची बाबांना, 'बाबा तुम्ही आता फार कमी बोलता आमच्याशी.' बाबा फक्त थोडे हसायचे. 
त्यांचे खळखळून हसणे तर बंदच झाले होते.
त्या दिवशी आईबाबांचे किती भांडण झाले होते. फारसे आठवत नाही.पण आईबाबांचा मोठा आवाज ऐकून मी घाबरले होते.  बाबांना आई काहीतरी दुसऱ्या बाईबद्दल बोलत होती. आनंदही  गेला बाबांसोबत.कायमचा. नंतर ते घर कधीही आनंदी झाले नाही. आईचे सुख,दुःख,आनंद सगळे बाबांशी निगडीत होते. आता आईच आनंदी नसायची म्हणून घरही आईसारखेच दुःखी राहायचे.
बाबा नंतर कधीही परत आले नाही. आई खूप वाट बघायची बाबांची. ते येणारच. माझ्यासाठी नाही तरी मुलांसाठी तरी येतीलच.असेच वाटायचे तिला.
ती शाळेतून घरी आली कि,घरचे कामे करता करता बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसायची. डोळ्यात सतत पाणी  असायचे. खूप रडत राहायची.
बाबा आम्हाला शाळेत भेटायला यायचे. मग आई आम्हाला सतत बाबांबद्दल  विचारत राहायची.आईचे केविलवाणे जगणे,बाबांसाठी रडणे बघून आता मला बाबांचा राग यायला लागला होता. 
बाबा शाळेत भेटायला आले तरी  मी भेटणे टाळायची.
मला माझ्या आईला रडवणाऱ्या  बाबांना भेटायला आवडायचे  नाही.पण बाबांची मला खूप आठवण यायची.पण मला कुणाला सांगता यायचे नाही.मग मी एकटीच रडत बसायची.
बाबाही काही दिवस नियमित भेटायला यायचे.नंतर हळूहळू कमी झाले त्यांचे येणे. आई बाबांबद्दल माहिती मिळते का याच्या शोधातच राहायची.
कोणीतरी आईला बाबांना आणि त्या दुसऱ्या बाईला मुलगा झाल्याचे समजले. त्यादिवशी आईने स्वयंपाक केला नाही. सईने जेवण बनविले पण आई उपाशीच राहली म्हणून आम्ही पण उपाशी राहिलो. 
आईची तगमग आम्हाला कळत होती पण आम्ही काय करु शकत होतो? 
दिवस जात होते.आता मला बरीच समज आली होती.
आई तिच्या तशा मनःस्थितीत देखील आमच्या अभ्यासाकडे,खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायची. पण आमचे एकमेकांशी बोलणे कमी असायचे.आई यंत्रवत सगळे करायची.  राजा जास्त घरात असायचा अभ्यास करत.बाबा दुसऱ्या बाई सोबत राहतात याची त्याला लाज वाटायची.सईला पण वाटत असणार. ती पण आधीसारखी मैत्रिणींना घरी आणायची नाही. आणि मी. मला पण कोणी बाबांबद्दल विचारले तर लाज वाटायची. पण मी जास्त वेळ बाहेर रमायची.घरात आले कि  घरातला तो तणाव नकोसा वाटायचा.सगळे आपापल्या कोषात असायचे.  आई तर आईच्या  कोषात घट्ट मिटलेली असायची. हसणे नाही,खिदळणे नाही, कुणाशी बोलणे नाही,कुणाला काही विचारणे नाही.बाबाच कारणीभूत होते ह्या सगळ्यांना. बाबा आमच्यापासून वेगळे झाले आणि  आम्हालाही एकमेकांपासून वेगळे केले. नंतर आयुष्यात कधीही आम्ही एकमेकांशी खूप जुळून राहू शकलो नाही.फक्त  नाते टिकवून ठेवले. आम्ही  सोबत राहूनही एकेकटेच वाढलो. आई कोणत्याही समारंभाला जायची नाही.
बाबांचे दुसऱ्या बाईसोबत राहणे आईला अपमानास्पद वाटायचे. लोकांनी काही विचारले तर काय सांगायचे?  लोक काय म्हणत असतील ?असे प्रश्न  तिला छळत राहायचे. 
मी मोठी होत होते. तरुण होत होते.यौवनात आले होते. बाबांचा मला राग यायचा पण मी बाबांना कधीही विसरु शकले नाही.बाबा आम्हाला सोडून का गेले असतील हा प्रश्न मनात नेहमी यायचा
   प्रिती  गजभिये.


ह्या डायरीचे उर्वरीत भाग Amazon kindle वर प्रकाशित  झालेल्या 'शलाकाची डायरी / Shalakachi diary' या पुस्तकात आपण वाचू शकता.

Comments

  1. Nice lakhan pritee
    Keep it up
    Sundar shabd rachana
    Great........

    ReplyDelete
  2. विदारक सत्य jyanni bhogal असेल त्यांच्या साठी

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना.Thanks Deepali ti visit my blog

      Delete
  3. Vaishali joshi ...khodwe ..विशाखा ...पुस्तक खुपच अप्रतिम आहे ....बऱ्याच स्रियांच्या मनातली व्यथा तु समर्थ पणे मांडलीस ...

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Vaishali to visit my blog and appreciate me.

      Delete
  4. पुस्तक खुपच आवङले ..शलाकाच्या मनाचे सुंदर वर्णन केले ....jyoti

    ReplyDelete
  5. Khup chan lihile asha ghatna ahet samajamadhe

    ReplyDelete
  6. विदारण परंतु भयाण वास्तव्य , शलाकाची वेदना मनाला चटका लावुन गेली

    ReplyDelete
  7. अमेझॉन किंडल लिंक शेअर करा

    ReplyDelete
    Replies
    1. Rahulji thanks to visit my blog.

      amazon.com/author/preetigajbhiye

      ही पुस्तकांची link आहे.open नाही झाली तर ॲमेझाॕनवर पुस्तकाचे नाव टाकले तरी open होईल.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही