छळतो आभास हा.....

आज संध्याकाळी चित्रकार  मानसच्या चित्रांचे प्रदर्शन  होते.पेपरमध्ये  जाहिरात बघितली आणि  घाईघाईने सुखदा आॕफिसमधून जिथे प्रदर्शन होती तिथे जायला निघाली.

काय सांगावे चित्रकार मानस येतील थोड्या वेळासाठी. मला उशीर झाला तर .....
नाही आज मला त्यांना  बघायचेच आहे.

या विचारानेच तिचे अंग शहारले.आॕफिसबाहेर आली पट्कन रिक्षा पकडली. 

जल्दी चलो.
रिक्षावाल्याला पत्ता देत सुखदा बोलली.
रिक्षावाल्याने रिक्षाचा वेग वाढवला.
सुखदाने पर्समधून मानसचे चित्र काढले त्याचे हळूवार एक चुंबन घेतले.आणि  एकटक त्या फोटोकडे बघत बसली. आॕफिस सुटल्यावर हे तिचे रोजचेच काम झाले होते.
 उतरो मॕडम, टाईमपें पहूँचाया आपको!

त्याचा आवाज ऐकून सुखदाने घाईनेच पण सांभाळून तो फोटो पर्समध्ये ठेवला. ती रिक्षातून उतरली आणि पळतच प्रदर्शन असलेल्या हाॕलकडे निघाली. मानससाठी होणारी तगमग फक्त तिची तीच  जाणत होती. 
 
सुखदा हाॕलमध्ये पोहचली.जिकडेतिकडे  मानसच्या कुंचल्यातून उतरलेली अद्भूत चित्रे लावली होती.सुखदाची नजर  चित्रे बघताबघता मानसचा शोध घेण्यासाठी भिरभिरत   होती.

 न राहवून बाजूलाच एका चित्र बघण्यात गुंग झालेल्या पुरुषाला तिने विचारले.
चित्रकार मानस नाही दिसत आहेत.

नाही ते नाही आले.

त्या पुरुषाने चित्रावरुन नजर न हलवता उत्तर दिले.
सुखदाला वाईट वाटले.

म्हणजे आजही मानस नाही दिसणार तर......

ती नाराज होत पुटपुटली. तिची नाराजी क्षणभरच राहिली.आता समोरची चित्रे  ती मन लावून बघू लागली. त्या चित्रांना मानसच्या हाताने स्पर्शीले होते.
या विचारानेच ती मोहरली.

 हे हे चित्र  मानसने माझ्यासाठीच बनवले.
 तिचे विचारचक्र सुरु झाले.
 यात या स्त्रीने नेसलेल्या साडीचा रंग मानसने माझ्याच पसंतीचा निवडला.मानस पण नं माझ्या प्रत्येक आवडीनिवडी जपतो. स्त्री ची पोजही --मी एकदा असाच ओलेता,अंगाला साडी चिपकून असतांना फोटो काढायला लावला होता.तशीच पोज आहे ही. किती कौतुक केले होते तेव्हा मानसने माझे,माझ्या सौंदर्याचे. शेवटी लाजून मीच थांबवले त्याला. काय तर म्हणे माझी सुखदाच माझ्या चित्रकारीची प्रेरणा आहे. तिच्या आरसपाणी सुंदरतेमुळेच मी चित्र काढायला लागलो. 

मॕडम जरा बाजूला होता का?
मागे उभ्या असलेल्या मुलीने बराच वेळ एकाच चित्रासमोर उभ्या असलेल्या सुखदाला म्हंटले.सुखदा जरा रागानेच बाजूला झाली.

माझ्याच मानसची चित्रे बघायला येतात आणि  मलाच बाजूला हो म्हणतात.काय म्हणावे या लोकांना. 

सगळीकडे मानसची चित्रे विखुरलेली होती. त्याची चित्रकारी लोकांना मोहीत करत असे.त्याने रंगवलेली चित्रे  कितीही वेळ बघितली तरी डोळ्यांचे पारणे फिटत नसे.
लोकांबरोबर सुखदालाही पुढे पुढे  सरकावे लागत होते.गर्दी बरीच होती.त्यामुळे एका चित्रासमोर जास्त वेळ उभे राहता येत नव्हते. सुखदा त्या कमी वेळातही जणू चित्राला मानसचे  झालेले स्पर्श अनुभवत होती.
प्रदर्शनाची वेळ संपली.सगळे हाॕलबाहेर पडले. सुखदालाही जड मनाने बाहेर पडावे लागले.
ती समोरच उभ्या असलेल्या रिक्षात बसली आणि घराकडे निघाली.
वसुधाताई, सुखदाची आई दारातच उभी होती सुखदाची वाट बघत.

सुखदा किती हा उशीर? एक फोन तरी करायचा होता. आॕफिसमध्ये फोन केला तर तू आज लवकर निघाल्याचे सांगितले. कुठे  होती एवढा वेळ?

आई,अग ते चित्रकार मानस आहेत ना त्यांचे चित्रांचे प्रदर्शन  होते ते बघायला गेले होते.

एकटीच

आईला आश्चर्य वाटले.सुखदा कधी कुठे एकटी जायची नाही.कुणाचा ना कुणाची सोबत तिला हवी असायची. 

बरं.जा.हाततोंड धुवून ये.
आम्ही जेवायचे थांबलोत तुझ्यासाठी.

सुखदा हाततोंड धुवायला आत गेली.
वसुधाताईः   एवढ्यात सुखा जरा बदलल्यासारखी वाटते.
काय कारण असावे बरे?

 ' छळतो आभास हा'
ह्या पुस्तकातील हा उतारा आहे.
पुस्तक Amazon Kindle वर उपलब्ध आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण

समर्पण-९

महिलादिन विशेष