संपलेली पायपीट

एकाच कारखान्यात काम करणारे सोळा जण.
गावाला कामधंदा नाही म्हणून काही दिवसच आधी
रोजंदारीसाठी गावावरुन शहरात आले होते.
थोडे दिवस पोट भरण्याइतपत पैसे मिळवतात न् मिळवतात तोच ह्या साथीच्या रोगाने त्यांच्या हातून रोजगार हिरावला.
हाताला रोजगार नाही म्हणून पोटाला घास नाही
घराचे  भाडे द्यायला पैसे नाही.
राहायचे कुठे अन् खायचे काय?
पोटापुरते पैसे बाजूला ठेऊन बाकीचे गावाकडे पाठवू हा गावावरुन येतांना मांडलेला हिशेब कधी पूर्ण  झालाच नाही. 
गावाकडे म्हातारे आईवडील,बायको,बहीण-भाऊ,छोटी छोटी मुले सोडून लांबून रेल्वेच्या तिकिटांसाठीही  कर्ज घेऊन  आलेल्या त्यांना करोनाने परतीची वाट धरायला भाग पाडले.
'शहरात येऊन फक्त पोटापुरता कामधंदा मिळाला 
आपली आधार देणारी माणसे गावातच राहिले,
आता कामच नाही म्हंटल्यावर इथे पोटाला घास मिळणेही दुरापास्त होणार.
आता इथे,शहरात राहणार कसे?
इथेच आपल्याला काही झाले तर...
आपले गावच बरे.
आपली मायेची माणसे वाट बघताहेत.
वापस जायला हवे'
सगळ्यांच्या मनात हे असेच विचार येत होते.
पण जायचे कसे?
धनी लोकांसारखी पास बनवून गाडीने तर जाऊ शकत नव्हते.
lockdown मूळे सगळीकडे पोलीसांचा पहारा.
कसे जायचे?
मनाची घालमेल स्वस्थ बसू देत नव्हती. 
आसुसलेल्या  डोळ्यांनी वाट बघणारी त्यांची माणसे
डोळ्यासमोर येत होती. 
एकाच राज्यातील वेगवेगळ्या गावची माणसे पण मनाची घालमेल,तगमग सारखीच.
गावाला जाऊन करु काहीतरी पण इथे नको आता. इथेच साथीच्या रोगाने आपण गेलो तर.........
या विचाराने भयभीत होत होते.
रोजच्या रोज एवढ्या लोकांना करोना झाला,
एवढे जण मेले हेच सगळीकडे ऐकायला,बघायला,वाचायला मिळत होते.
गावाकडूनही रोग पसरल्याच्या बातम्या येत होत्या.
आपल्या माणसांशी गाठभेट होणार कि नाही हा विचार मेंदुला बधीर करत होता.

कुणालाच काहीच उपाय सापडत नव्हता 
पण गावाकडे परतायचेच हे नक्की केले होते.
 शेवटी ज्या रेल्वेने गावावरुन इथवर आलो त्याच रेल्वे रुळावरुन पायी वापस जायचे ठरवले.
पायी
कित्येक किलोमीटर पायी....
नंतर एखाद्या शहरातून एखादे वाहन मिळले तर त्याने पुढे जाऊ असा विचार करुन सगळे सोबत निघाले.
प्रवास दूरचा,खूप दूरचा.
 सोबत रस्त्याने पोटात दोन घास घालायला काहीतरी असावे  म्हणून भाजीपोळी घेतली.
निघाले सोळाही जण परतीच्या प्रवासाला,
गावच्या ओढीने.
तिकडे जिवंत राहूच या विश्वासाने.
आपापल्या घरी सगळ्यांनी फोनवरुन आम्ही निघालोय....पोहचू....लवकरच भेटू....असा निरोप दिला.
घरचे शरीराने,मनाने थकलेल्या म्हाताऱ्या आईवडीलांना उभारी आली.
बायको आता एकटीवर असलेली जबाबदारी कमी होणार या विचारानेच सुखावली.
मुले वडील येणार म्हणून आनंदली.
सोळाही जण पुढे पुढे निघाले.
 चालत  राहिले.
वाटेवर त्यांना त्यांच्यासारखेच वापस जाणारी हतबल माणसे भेटली.
मुलं कडेवर घेतलेल्या आया,दोन्ही हातात सामानाचे ओझे घेतलेले वडील, 
वडीलांचे हात पकडून चालणारी अजाण मुले.
उन्हातान्हात सगळे चालत होते.
थकत होते. थांबत होते.परत चालत होते.
वाटेवरचे हे चित्र  उन्हाची दाहकता आणखीनच वाढवत होते.
परिस्थितीची भीषणता जाणवत होती.
जिवंत राहण्यासाठी सगळ्यांची पायपीट चालली होती.
एकेका पावलाने गावचे अंतर कमी करण्याची धडपड चालली होती सगळ्यांची.
रात्र झाली.
उन्हाची काहीली कमी झाली.
एका वाटेने चालत असलेल्या सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे झाले.
हे सोळा जण चालून चालून थकले होते
.भूकही लागली होती.
जरा विसावा घ्यावा म्हणून थांबले थोडावेळ.
एकेक पोळी खाल्ली.
बाकीचे पुढच्या प्रवासात पुरले पाहिजे  म्हणून ठेऊन दिले.
अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.
दिवसभर डोक्यावर ओझे आणि चटके देणाऱ्या उन्हात चालून चालून गात्र न् गात्र थकले होते.
तरी अजूनही ते चालतच राहिले.
चालणे थांबवून जमणार नव्हते.
हक्काच्या गावापर्यंत पोहचायचे होते.
आभाळात पोर्णिमेच्या चंद्राचा उजेड आसमंतात पसरला होता.
 त्या उजेडाच्या आधाराने चालत राहिले.
रात्रभर.
आता सुर्य उगवायची वेळ झालीच होती.
सूर्यप्रकाश यांच्या आयुष्यात प्रकाश आणणार होता कि....
थोडावेळ विसावा घेऊन पुढे जाऊ हा विचार करुन
रुळावरच थकलेले शरीर टेकवले.
थकलेल्या शरीराला झोप यायला कितीसा वेळ लागणार?
थोड्याच वेळात गाढ झोपले.
धाड् धाड् धाड् धाड्............
मालगाडीच्या आवाजाने एक दोघेच उठू शकले. 
मृत्यूची चाहूल बाकीच्यांना लागलीच नाही. 
झोपेतच गेले ते.
त्यांच्या गावापासून,त्यांच्या माणसांपासून दूर दूर.
ज्या रुळावरुन आशेने,उमेदीने आले होते त्याच रुळावर विसावले. 
सूर्याच्या उगवतीलाच यांचे आयुष्य मावळले होते.
त्यांची पायपीट कायमचीच थांबवली मालगाडीने.
 त्यांचा गाव आणि त्यांची माणसे यांच्यात आता खूप अंतर पडले होते.......

  
                 प्रीती

Comments

  1. खूप विदारक 😢

    ReplyDelete
  2. खूप दुःखद... खूप खूप छान लिहितेस तू विशाखा.सगळ्या कथा एकत्र करून छानसा कथासंग्रह प्रकाशित कर.तुला खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. Vastavikta.. khup chan mandli. Shirish

    ReplyDelete
  4. वस्तुस्थिती खूप कठीण परिस्थिती आहे मजुरांची..

    ReplyDelete
  5. Smita Aurangabadkar

    Khup khup surekh
    Tuze vichar mandatana
    Yogya shabd
    rachana kelis

    Manala hadarun takanara lekh

    Ashich chan chan subject var lihit ja
    Best of luck 💐💐
    👌👌👌👌👌👌


    ReplyDelete
  6. खूप भीषण सत्य
    वाचून अंगावर काटा आला ,विशाखा
    त्यांच्या घरच्या लोकांचे काय हाल झाले असेल, विचार करून वाईट वाटते
    ..........मोहिनी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समर्पण-९

निरोप--- एक शाश्वत सत्य.

शब्दपर्ण

महिलादिन विशेष

जीवनगाणे-सप्तसुरांचे

अद्भुत जग---कथा क्र.-१०

गृहिणींचा प्रजासत्ताक

पूर्वसंकेत---एक गूढ

अद्भुत जग---कथा क्र.-५

नाजूका भाग-२