प्रिय वरुण
प्रिय
हो. शब्द बरोबरच वाचला तू.
प्रिय आहेस म्हणून तर सगळे गुन्हे माफ आहेत तुला.
आज तुझे लग्न आहे.तुझ्या बहिणीने उर्मीने सांगितले. माझे हे पत्र तुला मिळेस्तोवर आठएक दिवस झालेले असतील तुझ्या लग्नाला.
आपले लग्न आठवते का रे तुला? माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन केलेले. एकदम thrilling experience होता वगैरे म्हणायचास तू.
तुझ्या प्रेमात वाहवत गेलेली मी माझ्या घरच्यांना शत्रू समजत राहिली.
पण मस्त सुरु होता आपला संसार.म्हणजे अगदीच नजर लागण्यासारखा म्हंटला तरी चालेल.
नविन संसार, नवी अनुभूती,एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलो आपण, सगळेच नवीन होते दोघांसाठीही.
आताचा हा तुझा संसार तसाच सुरु आहे का? आपल्यासारखा?
मला आठवते मी इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षाला आणि तुझे तिसरे वर्ष. काँलेजच्या अॕन्युअल डे ला मला बघितलेस आणि वेडापिसाच झाला तू माझ्यासाठी.
मी तुला हो म्हणेपर्यंत मागे मागे होतास.
किती बहाणे शोधत राहायचाच मला बघण्याचे,भेटण्याचे. आता आठवून हसू येत आणि सोबत आसु पण येतात.
मला पण तू आवडायला लागला होता.तुझी हुशारी, बोलण्याची ढब, तुला अवगत असणाऱ्या विविध कला.मला तर तू सर्वगुणसंपन्न वाटायचास एकदम सिनेमातल्या हिरोसारखा.
काॕलेजमधून वेळ मिळाला कि आपण सोबतच राहायचो. सगळ्या मित्रमैत्रिणांना टाळून दोघांसांठीच वेळ द्यायचो.अन् तरीही तो वेळ अपूर्ण वाटायचा.
एकमेकांच्या होस्टेल मध्ये परवानगी नव्हती म्हणून रात्रीपूरतेच फक्त आपण वेगवेगळे राहत होतो.
दुसऱ्यांकडून ऐकलेले,पुस्तकात वाचलेले,सिनेमात बघितलेले प्रेम एकमेकांच्या सोबतीने अनुभवत होतो.
दोघेही होस्टेलमध्ये राहत होतो त्यामूळे घरच्यांना माहित होण्याचा प्रश्न नव्हताच.
तुझे फायनल इयर संपले पण माझे अजून एक वर्ष बाकी होते म्हणून तू दुसऱ्या शहरात नौकरी करायला तयार नव्हतास. होस्टेलच्याच बाजूने रुम घेऊन तू राहायचास. वेळ आहे म्हणून इंजिनियरींगच्या मुलांच्या ट्युशन्स आणि वाचलेल्या वेळात MPSC चा अभ्यास करायचास. लहानपणापासून सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न होते तुझे.
फायनल ईयरला असतांना मला लग्नाची मागणी यायला लागली.फायनल झाले कि माझे लग्न करायचे हे जवळपास ठरलेच होते.
मी गावी गेली तेव्हा आईबाबांना सांगितले पण आपल्या दोघांच्या जातीतले अंतर आडवे आले. मला लक्षात आले जातीतला फरक लग्नाला होकार देणार नाही. मग मी वापस आल्यावर फायनलची परिक्षा संपल्याबरोबर आपण लग्न केले.
लग्न करुन मी तुझ्या खोलीत शिफ्ट झाले.
तुला अभ्यास करायला वेळ हवा असल्यामूळे तुझ्याऐवजी मी नौकरी करायली लागली.आपला संसार मजेत चालला होता. एकमेकांसाठी वेळ कमी मिळायचा आता आपल्याला. त्यामूळे जो वेळ मिळेल तो आपण प्रेमातच घालवत होतो.
तुझी परिक्षा जवळ आली होती म्हणून तू जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्यायचा.
परिक्षा संपली. तू prelims झाला मग mains आणि intetview सुद्धा.पहिल्याच प्रयत्नात तू चांगली पोस्ट पटकावलीस. आपण किती आनंदी होतो. अगदी आकाशच ठेंगणे झाले होते आपल्याला.
आपले दोघांचेही मित्र मैत्रिणी मिळून काय मजा केली होती रे आपण.
सगळे कसे डोळ्यासमोर तरळतयं हुबेहूब.
सिनेमाच्या रीलसारख्या वाटतात ह्या आठवणी. एकदा रील सुरु झाली कि संपेपर्यंत थांबायचे नाव नाही. सिनेमासारख्या जसाच्या तशा समोर येत आहेत बघ आठवणी.
दिवस आनंदात,मस्तीत चालले होते. आपण मोठ्या घरात शिफ्ट झालो.
तुला चांगली नौकरी मिळाली होती.आता तू मला नौकरी सोडायला लावली.मी महत्वाकांक्षी कधी नव्हतेच.त्यामूळे मीही आनंदाने नौकरी सोडली.
घर नवनवीन सामानांनी सजवले आपण. भविष्याची कितीतरी स्वप्ने रंगविताना त्यात रंगत गेलो.
दहाएक वर्षांचे प्लानिंग केले होते आपण. त्यात मुले,तू माझ्यासाठी काय काय करणार सगळेच होते.
पण आपण ठरवतो एक आणि होते दुसरेच.
आपल्या सोबत तर ध्यानीमानी नसलेलेच घडत गेले.
आपण जसे ठरवले तसे झाले असते तर सुखी माणसाचा सदरा सगळ्यांनाच मिळाला असता.
तू हळूहळू नौकरीत रमत गेला. घरी यायला उशीर होत होता. मी काही म्हंटले तर सिस्टीमच तशी आहे.आपल्याला सिस्टीमनुसारच वागावे लागते वगैरे कारणे सांगायचास. मीही तुझे खरे मानत गेले.
आधी महिन्यातून मग पंधरा दिवस,आठवड्यातून आणि नंतर नंतर तर रोजच पार्ट्या चालायला लागल्या तुझ्या. रोज रात्री तू दारु पिऊन घरी यायला लागला. तू घरात आल्या आल्या दारुचा येणारा उग्र दर्प जीवघेणा वाटायचा.पण तुला फरक पडायचा नाही.पक्का व्यसनी झाला होता तू.आता तुला मला होणाऱ्या त्रासाने,माझ्या रडण्याने, अबोल्याने काहीही फरक पडत नव्हता.
तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मी,तुझ्या घरच्यांनी,आपल्या मित्रांनी पण तू मागे फिरायला तयार नव्हता.
माझ्या सगळे सहन करण्याच्या
पलीकडे चालले होते.
मी तक्रार करावी असे कुणी नव्हते मला. माहेर लग्नापासून तुटले होते. मला काहीही करुन तू आधीसारखा व्हायला हवे होते.पण तू ऐकायला तयार नव्हता.नंतर तर केवळ दारुसाठी सुट्ट्या घेऊन तू घरी राहायला लागला.
मी विचार करायची,तू आता असा ऐकणार नाहीस.तुला काहीतरी धाक दाखवायला पाहिजे, तुला जरब बसवायला काहीतरी करायला हवे.मी खूप विचार करुन अविचारी निर्णय घेतला. तुला होशमध्ये आणायचा तो एकच मार्ग तेव्हा मला सुचला. असाच एक दिवस तू पिऊन पडून होता.मी लवकर पेट घेणारी नायलाॕनची साडी नेसली.आणि गॕसजवळ जाऊन पदर पेटवला.
अगदी एका सेकंदात साडीने पेट घेतला.
आग चेहऱ्यापर्यंत गेली.वेदनेने मी ओरडू लागले,विव्हळू लागले. ज्याच्यासाठी जाळून घेतले तो बेहोश होता.शेजारचे धावत आले. मला दवाखान्यात घेऊन गेले. नंतर कधीतरी माझ्या बाजूने तू उभा असलेला आठवतो मला. आताही त्या वेदना आठवतात रे मला.
मला सुट्टी होऊन घरी आले. तू तसाच होता.काहीही बदल न झालेला.बदल माझ्यात झाला होता.फरक माझ्यात पडला होता. माझा चेहरा माझा राहला नव्हता. आरशात मला बघायची मलाच भीती वाटत होती.आरशात बघणे सोडले मी.
तू आता घरीच राहायचा जास्त. तू बदलला नाही आणि मी मला पण गमावून बसले
मध्ये तुझा एक मित्र खूप दिवसांनी तुला भेटायला आला. तू बोलायच्या अवस्थेत नव्हताच. मला त्याने एका व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता दिला. दोन दिवसानी तुला बेहोशीतच मी तिथे नेऊन भरती केले. एकदा भरती केल्यावर मला तुला भेटण्याची परवानगी नव्हती. मध्ये मध्ये फोनवर आपण बोलू शकत होतो.
सुरवातीला तिथे तुला खूप त्रास व्हायचा दारुशिवाय राहण्या. फोनवरच माझ्यावर ओरडायचा.पण नंतर हळूहळू तू शांत वाटायला लागला.आधीचा तू परत येणार ही आशा निर्माण झाली.एक महिना झाला होता तुला जाऊन.डाॕक्टरांनी फोन करुन तुला घेऊन जायला सांगितले .तू आता पूर्ण व्यसनमुक्त झाला होता. मी तेव्हा झालेला आनंद व्यक्त नाही करु शकत आहे. आठवून आताही रोमांच उभे राहतात अंगावर.
मी घाईघाईने काहीही विचार न करता निघाले तूला आपल्या घरी न्यायला. माझ्यासाठी जणू तू नव्याने जन्मला होता.त्या आनंदलहरीत मी माझा चेहरा विसरुन गेले होते.
मी पोहचले केंद्रात.तू सामान घेऊन बसलेला दिसला.मी दिसल्याबरोबर तू धावत येवून मिठीत घेशील असेच वाटले होते. पण मी थेट तुझ्याजवळ उभी राहले तरी तुझी नजर गेटकडेच होती.वेड्या तू तुझ्या पिहूला ओळखलेच नव्हते.तेवढ्यात तिथे डाॕक्टर आले.माझ्याशी तुझ्याबद्दल बोलायला लागले.तेव्हा कुठे हळूहळू तू मला ओळखले.
पण माझे असे विचित्र रुप बघून तू पुरता हादरला होता.आपण घरी आलो निःशब्दपणे. घरातही आपण एकमेकांशी बोलत नव्हतो.मी करायची प्रयत्न पण तूला माझ्याकडे बघण्याचे धैर्य होत नव्हते.
दोघांच्या जातीत असलेले अंतर आपण मिटवले होते.आपल्या जातीतला फरक आपण संसारात येऊ दिला नव्हता.पण माझ्या चेहऱ्यात पडलेल्या फरकाने संसारात कायम अंतर पडणार होते. माझा चेहरा बदलला होता. मन,भावना तशाच होत्या. पण चेहऱ्याशिवाय मन तुझ्यापर्यंत पोहचत नव्हते अन् तू प्रेम केलेला चेहरा मी परत मिळवू शकत नव्हते.
नात टिकवतांना दोघांचीही घूसमट चालली होती. दोन बेटावर वेगवेगळे आयुष्य जगत होतो एकाच घरात राहून.
त्या माझ्या एका आततायीपणे घेतलेला निर्णयाने पूर्ण संसाराच उध्वस्त झाला आपला.मी चुकले होतेच पण ती चूक व्हायला कारणीभूत तू ही नव्हता का? तरीही शिक्षा मात्र मला एकटीलाच मिळणार होती.
मी तुला सोडण्याचा निर्णय घेतला. मी गेल्याशिवाय तुझे नवे आयुष्य सुरु होणार कसे?
मी तुला घटस्फोटाबद्दल विचारले.तू जराही आढेवेढे घेतले नाही.जणू तू त्याचीच वाट बघत होता.
घटस्फोट घेऊन मी निघून आले.मी कुठे जाणार?कशी राहणार? तू एकही प्रश्न मला विचारला नाही.
तू चूक कि बरोबर मला माहित नाही पण तुझ्या जागी मी असते तर....
तुला सोडण्याचा विचार कधीच केला नसता.
असो.
पत्र भिजले बघ लिहिता लिहिता.
आणि आता तू वाचता वाचताही ते भिजले असणार तुझ्या आसवांनी.
तुझीच
पिहू.
प्रिती गजभिये (विशाखा)
प्रिय वरुण?
कसे वाटले? रसिकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
आगामी
प्रिय पिहू.
छानच
ReplyDeleteShailesh
अग विशाखा ...किती छान लिहीलेस ग .......खुप रडायला आले ...वाचता वाचता ..... वैशाली जोशी ..खोडवे ...
ReplyDeleteजीवनात कधी काय होईल काही सांगता नाही येत..
ReplyDeleteखूप भावनिक.
ReplyDeleteEk chan kathanak
ReplyDeleteबाई पुरुषामधले बदल कसेही असोत, ते स्वीकारते, जबरदस्ती म्हणून नाही तर पूर्णपणे जबाबदारी घेऊन, पण पुरुष बाई मध्ये झालेला बदल स्वीकारणं तर दूरच बघणं ही पसंत करत नाही, मोठी विडंबना
ReplyDeleteखरंय , रागात, घाईने, अविचाराने उचललेले पाऊल कधी कधी धोकादायक वळणावर घेऊन जाते.
ReplyDeleteछान भावना रेखाटल्या , मन सुन्न झाले.
...............मोहिनी
किती सुरेख लिहिले ग.तूझ लिखाण खूपच वेदना देऊन गेल....jyoti
ReplyDeleteNice , keep it up
ReplyDeleteKhup chan lihites priti tuze likhan manala bhidte
ReplyDeleteखरचं अति घाई.. संकटात नेई हे म्हणतात ते खोट नाहि.. पण माणुस मन ओळखत नाहि हेहि तितकेच खरं .. मनाला भावले लिखाण..
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूप छान लिहलय,अविचाराने घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो, सौंदर्यावर प्रेम करणारांची टक्केवारी अजुनही खूप आहे समाजात, सुधारणे गरजेचे आहे,छान लेख,शुभेच्छा
ReplyDeleteमाधुरी