अद्भुत जग---कथा क्र.-५

वाचक मंडळी, 
विषय एक कथा अनेक
या आमच्या कथामालिकेत आम्ही नविन विषय घेऊन आलो.
अद्भुत  जग--- या विषयावर  पूर्णपणे काल्पनिक असलेल्या कथा आहेत.
वादातीत असलेल्या या विषयावर लिहितांना एक गोष्ट जाणवली.काल्पनिक असले तरी लिहितांना अद्भूतता आणि थरारकता स्पर्शून जाते.
अर्थात वाचकांच्या सुचनांचे स्वागत आहेच.

अद्भुत जग---कथा क्र.-५

सिद्धार्थ :  बसा न काका खुर्चीवर,  तुम्ही उभे का राहता नेहमी ? काका तुम्ही लाल शर्ट का घालता ?  दुसरे शर्ट नाहीत का तुम्हाला  ? माझ्या बाबांना विचारून त्यांचा शर्ट देईन मी तुम्हाला, 

   :   माझ्या बायकोला वीणाला लाल रंग खुप आवडतो. तिनेच आणला माझ्यासाठी हा शर्ट.

सिद्धार्थ : मला पण आवडतो लाल रंग,  पण आई मला लाल रंगाचे कपडे घालु देत नाही . ती म्हणते तु गोरा आहे ना,  लाल कपड्यात तुला दृष्ट लागते.
 तुम्ही डोक्यावर रोजच लाल रंगाची टोपी घालता ?


   : तिनेच आणली होती माझ्यासाठी ही कॅप.

सिद्धार्थ बैठकीच्या खोलीत कोणाशी तरी बोलत होता.
सईच्या कानावर त्याचा आवाज आला म्हणुन ती बाहेर बघायला आली तर सिद्धार्थ खुर्ची कडे तोंड करून एकटाच बडबड करत होता.

जेमतेम महिनाच झाला होता त्यांना या नविन घरात येऊन.
मयुर अपार्टमेंटमध्ये तीन विंग.  त्यातल्या बी बिल्डिंग मधला 202 क्रमांकाचा फ्लॅट संजयने  किरायाने घ्यायचे ठरवले होते.  रस्त्याच्या बाजुकडील , भरपूर हवा, सुर्यप्रकाश, प्रशस्त बाल्कनी असलेला फ्लॅट संजयला आवडला होता.
त्याने वॉचमनकडून फ्लॅटची किल्ली घेतली . बी 202 चे नाव ऐकुन लगतच्या फ्लॅटमधील बाई विचित्र नजरेने संजय कडे एकटक बघत होती . त्याला जरा आश्चर्य वाटले. ओळख व्हावी म्हणुन संजय त्या बाईकडे बघुन किंचित हसला.  तशी ती बाई झटकन आत निघुन गेली आणि दार लावलं . 
202 प्रशस्त फ्लॅट संजयला बघताक्षणीच आवडला आणि सई सिद्धार्थ ला पण नक्कीच आवडेल म्हणुन संजय खुश होता . सिद्धार्थ , संजय सईचा पाच वर्षाचा मुलगा.
 पण संजयच्या डोक्यात एक शंका होती.
इतका प्रशस्त हवेशीर फ्लॅट इतके दिवस रिकामा कसा?
सई सिद्धार्थला फ्लॅट दाखवून बी 202 वर शिक्कामोर्तब झाला.
 आधीचे घर लहान आणि संजयला ऑफिसपासुन आणि सिद्धार्थला शाळेपासुन बरेच लांब पडत होते म्हणुन घर बदलण्याचा निर्णय झाला होता.
एक चांगला दिवस बघुन सामान हलवले . त्या आधी एक दिवस संजय सईने नविन घरात गणपतीचा फोटो नेऊन लावला होता.
उंबरठ्यात पाऊल टाकताच सिद्धार्थ अडखळला.  समोर डोळे विस्फारून बघत राहिला . सई संजयला कळेना याला अचानक काय झाले ? 

 " अरे सिद्धार्थ बघतो काय आहे ? आपले नविन घर आहे". तसा तो भानावर आला.

नवीन घरात येण्याआधी सिद्धार्थचा जो उत्साह होता तो एकदम मावळला होता.  तो घरात एकटक कुठेतरी बघत बसायचा . सईच्या लक्षात आले ते,  पण नवीन जागा आहे रुळेल हळुहळू असं तिला वाटलं.
काही दिवसांनी सिद्धार्थच्या वागण्यात आपोआपच मोकळेपणा जाणवला तिला.
या घरात सिद्धार्थ बाबतीत काही विचित्र घटना घडू लागल्या.
सिद्धार्थ बैठकीच्या खोलीत एकटाच बडबड करत बसायचा . सईला वाटलं सिद्धार्थशी खेळायला कोणी नाही. एकटाच आहे,  नवीन जागेत अजुन ओळखी नाही झालेल्या.  म्हणुन स्वतःशीच बोलतोय आणि करमणुक करून घेतोय.  म्हणुन कामे आवरली की मुद्दामून त्याच्यासोबत वेळ घालवायची , पण तेव्हा सुद्धा त्याची नजर घरात इकडे तिकडे भिरभिर फिरायची . 
सईने त्याला एक दोनदा विचारले , पण पाच सहा वर्षाचा मुलगा तो . त्याला काही कळतच नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं.
 दिवसभराचे कमी होते की काय , आता सिद्धार्थ झोपेत सुद्धा बरळू लागला होता. याआधी कधी तो झोपेत बोलला नव्हता.

आणि आज सिद्धार्थचे बोलणे ऐकुन ती गर्भगळीत झाली. तिच्या जिवाचा थरकाप झाला आणि ती रडायला लागली. एवढ्या लहानश्या मुलाला कोणत्या कोणत्या घटनांना सामोरे जावे लागतेय, या भितीने तिची गाळण उडाली.
तिने फोन करून संजयला घरी बोलावून घेतले, 
ऐकून तोही मनातुन चरकला होता.
त्याच मध्यरात्री सिद्धार्थला अचानक जाग आली,  डोळे किलकिले करून पहिले तर बेडरूमच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये 'ती' व्यक्ती उभी दिसली त्याला.  रात्रीची वेळ अर्धवट झोपेत त्याला 'तो ' दिसल्याने सिध्दार्थ घाबरला तोंडातुन आवाज निघेना.  हलवून सईला उठवेपर्यंत 'ती' आकृती नाहीशी झाली होती .
सुरुवातीला संजयने विश्वास ठेवला नाही . याच घरात संजयला प्रमोशन मिळालं होतं,  पगारवाढ झाली होती. पण सिद्धार्थने खरं सगळं सांगितलं होतं. 

या सगळ्या घटनांमुळे सईला एक जुनी गोष्ट आठवली,  की जी ती संजयला सांगायला विसरली होती.
 एक दिवस सई घरात एकटीच होती . तिच्या पुण्याच्या बहिणीचा व्हिडिओ कॉल आला. तिला नविन घर बघायचे होते.  सगळं घर पाहिल्यावर दोघींच्या व्हिडिओ कॉलवर गप्पा सुरू असताना  बहिणीला सईच्या मागुन कोणीतरी जाताना दिसले. तसे तिने विचारलेही ..
"ताई भाऊजी घरी आहेत का ग ?"

"नाही ग ! दोघे बाहेर गेले ".

"मला तुझ्या मागुन कोणीतरी जाताना दिसले ".

मागे वळुन पहिले तर कोणीच नव्हते. क्षणभर सई घाबरली होती.
सईला आत्ता त्या गोष्टीचे गुढ उकलले होते.

दुसऱ्या दिवशी सईने समोरच्या कुलकर्णी काकुकडे विचारपुस केली.

मकरंद वीणाचे हे घर . थोडे थोडे पैसे जमा करून,  प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता. वीणाच्या मनानुसार त्यात बदल केले होते. खूप काळजी घ्यायचे ते घराची . खुप जीव होता त्यांचा एकमेकांवर आणि घरावर .  
वीणाला लाल रंग खूप आवडायचा.
वीणाला प्रथम दिवस याच घरात गेले होते. पण नियतीने काही वेगळेच लिहिलं होतं   पहिल्याच बाळंतपणात वीणा आणि बाळ  मकरंदला आणि आवडत्या घराला सोडुन गेले.  मकरंदला हा धक्का सहन झाला नाही. वीणा शिवाय त्या घरात राहणे त्याला खुप जड जाऊ लागलं . वीणाला आपण कसलंच सुख देऊ शकलो नाही या विचाराने त्याच्या डोक्याचा भुगा व्हायचा आणि एक दिवस हृदयावरचा हा ताण सहन न झाल्याने झोपेतच हार्ट फेल ने तो पण वीणाजवळ पोहोचला. 
 पण अतिशय आवडीने सजवलेल्या घरात त्याचे मन गुंतले होते . 
मकरंद वीणाची शोकांतिका ऐकुन संजय सई हादरले होते.

' बाबा ' म्हणुन हाक मारायच्या आधीच त्याचं बाळ 
त्याच्यापासुन काळानी हिरावून नेलं होतं. सिध्दार्थ शी  बोलतांना त्याचा आत्मा तृप्त होत असेल.

संजय सई तिथे येण्याच्या आधी, बी 202 मधे राहायला आलेल्या एक दोन कुटुंबातील अर्धवट वयातील व्यक्तींचा अकाली मृत्यु झाला होता, अशीही माहिती कुलकर्णी काकुंनी दिली होती.
 आणि त्या घरात एक वर्ष ही व्हायच्या आत त्यांनी ते घर बदलण्याचा निर्णय घेतला.
        
                             लेखिका

                   मोहिनी पाटनुरकर राजे

वाचक मंडळी,
आवडत आहेत का कथा?
तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण

समर्पण-९

महिलादिन विशेष