अधीर मन झाले....... (लेखिका मोहिनी पाटनुरकर ---राजे)



आज दिवसभर आभाळ खूप दाटून आलं होतं. दाही दिशा अंधारल्या होत्या. नेहमीपेक्षा खूप लवकर दिवस मावळतीला गेला असं वाटलं.  तसे श्रावण यायला अवधी होता, पण आषाढातचं श्रावण सरी बरसणार असं वाटत होते. 
‌ संध्याकाळ झाली सखुनी विठोबा जवळ आणि तुळशीजवळ दिवा लावला.
‌ तिने व्याकुळ होऊन विठोबाच्या मूर्तीकडे पाहिले. डोळे भरून आले तिचे. विठोबाला तिच्या डोळ्यातली तळमळ दिसली असेल ???
‌ आज आषाढी एकादशी सखू हरी दोघांचाही उपास. दोघांनी हरिपाठ म्हंटला.  फराळाचे ताट वाढून घेतले. 
‌.      ' त्या' लाही वाढले.  फराळ आटपला. आवरून झालं. दोघेही शांत नुसते बसून राहिले. दोघे काहीच बोलत नव्हते. झोपायला अजून अवकाश होता,  तेवढी रात्र झालेली नव्हती.
‌ आषाढी असूनही दोघेही उदास, अस्वस्थ होती.. घरात दोघेच हरी आणि सखु , पिंपळगाव एक छोटसं त्यांचं गाव. शेतीव्यवसायातून उदरभरण होते. एक मुलगा तो सैन्यात भरती .
‌दोघांचीही विठ्ठलावर प्रचंड भक्ती.
‌ काळ्याकुट्ट आभाळांनी त्यांचं काम सुरू केलं . सरी बसायला लागल्या, त्यासोबतच सखूच्या डोळ्यातही आसवांच्या धारा वाहायला लागल्या.
‌शांत वातावरणात विजांचा कडकडाट जरा जास्तच वाटत होता.  विजांच्या कडकडाटा सोबत सखुच्या हुंदक्यांचा आवाजही मिसळत होता. सखुहरी सोबत ढगही आक्रोश करत होते. काळजातून विठोबा साठी आक्रंदत होते . दोघेही तळमळत होते . पण सांगणार कोणाला तळमळ ? हृदयात दाटून येणारा गहिवर?
‌सखुनी गोधड्या अंथरल्या,  जमिनीला पाठ टेकवली. वारीची आठवण करत , विठोबाचं  रूप मनात साठवत दोघे छताकडे बघत होती.
‌दाराची कडी वाजली.  दोघेही वारीच्या आठवणीतून बाहेर आले.
इतक्या रात्री.... कोण असेल


‌ सखु मनातून चरकली.  कोरोना महामारी च्या संकटामध्ये चोऱ्या, लूटमार वाढली होती हे तिने ऐकलं होतं. तिने नवर्‍याला दार उघडू नका म्हटलं. घरात ही दोघेच. काही विपरीत घडलं तर इतक्या रात्री, अंधाराचं कोणाला मदतीला बोलवणार ?
‌ पुन्हा दाराची कडी वाजली. हरीनी काहीच विचार न करता झटदिशी दार उघडलं, संचारल्यासारखं. 
‌दारात चिंब भिजलेला एक साठीचा माणूस उभा होता.  रंग काळा-सावळा, कपाळी गंध ओघळून पसरलं होतं.  हातात आधारासाठी ची काठी, खांद्यावर घोंगडी 
लपेटलेली. पावसाने भिजलेला थरथरत होता. हरीनी त्याला आत घेतलं, आणि थोडी विचारपूस करून त्याने स्वतःचे धोतर बंडी त्याला घालायला दिली. त्याने कपडे बदलून, झटकुन बाजुला खाटेवर वाळत घातले. आता त्याला थोडी तरतरी आली होती. 

‌तो :  बाबा गावाकडे निघालो होतो.  मी पण शेतकरी हाय. पण महामारी च्या बंदीमुळे सरकारने अचानक एस्ट्या बंद केल्या अन्  इकडीच अडकलो. मध्येच पावसाने गाठलं बघा, अन् तुमचं घर जवळ केलं. घरचे चिंतेत असतील.
(त्याने हात जोडले)रात्रीपुरता आसरा द्या. सकाळी  काही सोय झाली तर बघतो. 
‌त्याच्याजवळ एक छोटा मोबाईल होता. त्यानी घरच्यांना काळजी नसल्याचं कळवलं. 
‌ हरी नी त्याला जेवायचं विचारलं, हसून म्हणाला, "एकादस आहे बाबा".
‌'त्या'चं ताट तसंच होतं. तेच त्या पाहुण्याला आणून दिलं. घर छोटंसंच, सखुची नाराजीची कुजबूज त्याच्या कानावर पडत होती. त्याला डीकाशन दिला पिऊन त्याला थोडी हुशारी आली. 
‌हरीच्या आत्मीयतेने तो थोडा मोकळा झाला. 
‌ तशी ही हरी सखुला झोप येत नव्हती. पाहुण्याशी गप्पा करायला तिथेच बसला.
‌हरी :   तीस-पस्तीस वर्षे झाली आमची पंढरीची वारी कधी चुकली नाही. 
‌हरीला ही कोणीतरी मन मोकळं करायला भेटलं होतं. का कुणास ठाऊक पण हरीला तो कोणी जवळचा वाटत होता.
हरी : पेरण्या करून,  एक राखणदार ठेवून, विठ्ठलाच्या भरोशावर शेत टाकून आम्ही वारीला जातो, हर साल. या महामारी ने मात्तर यंदाची हुकली.
‌ हरीची तळमळ त्याच्या बोलण्यातून पाहुण्याला जाणवत होती. हरीनी त्याला वारीत आलेले काही अनुभव, अडचणी सांगितल्या. वारीतील भजने, नाच, फेर धरणे, रिंगण,  सगळी वारी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. सखूला, तिच्या डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाच्या ओढीने निघालेली दिसत होती. दोघांचेही डोळे नकळत पाणावले. 
‌ हरी : एकदा आम्हाले मुख्यमंत्र्यांसोबत पहिल्या दर्शनाचा लाभ बी मिळाला व्हता. सगळी त्याची कृपा. 
‌सखुनी पटकन त्यावेळेस चे फोटो दाखवले.
‌ पाहुणा गालातल्या गालात हसला. गप्पाच्या ओघात बरीच रात्र झाली होती. सखुनी पाहुण्याला एक गोधडी दिली. हरीनी खाट टाकून दिली.
पाहुणा :  तुम्ही झोपा आता. थोड्या वेळानं उजाडेलच,  पावसाचा जोर बी ओसरला. मी निघतो पहाटी. आता तुम्हालाबी शांत झोप लागेल.
‌ हरी चरकला.
‌पाहुणा :  म्हंजी तुमी बोलून मोकळा झाला सा.
‌ दोघेही आत निघून गेली. पाहुण्यांनी अंग टाकलं.
‌ सखु हरीला खरोखरच गाढ झोप लागली. शांत. विठोबाचे दर्शन झाल्यावर लागते तशी.
‌ सखुला पक्ष्यांच्या किलबिलाटमुळे जाग आली. नेहमीपेक्षा आज तिला उशीर झाला, उठायला.  तिला पण नवल वाटलं,  त्याचं.
‌ तिने हरीला उठवले. 
पाहुण्यांना दार काढून द्या. त्याचा त्याला जाऊ द्या, असं म्हणाली. 
‌ हरी बाहेर आला. बाहेर कोणीच नव्हतं. पाहुणा निघून गेला म्हणावं तर दाराला आतून कडी.  हरीनी मोठ्याने सखुला हाक मारली. तिला वाटलं, आपल्याला गुंगी देऊन तो चोरी करून गेला.
‌ बाहेर त्याची काठी न घोंगडी कोपऱ्यात ठेवली होती.  हरीचे कपडे घडी करून खाटेवर होते.  त्याला दिलेले फराळाचं ताट..,... फराळाचं भरलेलं होतं त्यात. पाहुण्यांनी तर हरी समोरच फराळ केला होता. 
‌ हरीनी  खाटे वरचे कपडे हातात घेतले. त्याला गंधाचा, चंदनाचा सुगंध येत होता.
‌दोघांनाही पाहुण्याची ओळख पटली होती.
सखु हरीच्या डोळ्यातले ढग दाटून आले. सरी बरसत होत्या ...............



Comments

  1. धन्यवाद विशाखा

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा.....खुप छान,-हदयस्षर्षी लेख वाचुन समाधान वाटले.
      सर्व प्रथम नवोदित लेखिका,सौ.मोहिनी शैलेश पाटणुरकर,तुमचे मनःपुर्वक अभिनंदन.
      "अधीर मन झाले.." या शिर्षकाचे गांभीर्य हा लेख वाचल्यावर जाणवले.खरंच त्या सखुला विठोबा बद्दल आणि वारी बद्दल किती कुतुहल,आत्मियता होती.त्याचे सततच्या आठवणीने साक्षात दर्शन देउन गेला तिला विठोबा.भक्ती ही अपरंपार असते.परमेश्वराला भक्ती व्यतीरिक्त भौतिक कोणत्याच वस्तुची अपेक्षा नसते.
      हरी ची विठोबा बद्दल सखु ईतकी भक्ती नसल्यामुळे त्याचे मनात चुकीचा विचार येउन गेला.....
      पण चंदनाचा सुगंध दरवळत राहिल्याने दोघेही कृृृृतार्थ झाल्याचे समाधान त्यांना लाभले.
      या लेखा मध्ये खुप छान शब्दरूपी भावना व्यक्त केल्या आहेत.
      तुमचे या लेखास खुप खुप शुभेच्छा.असेच अप्रतिम,नवनविन लेख तुमचे कडुन वाचनास लाभो हिच सदिच्छा.

      महेश श्रीनाथ बोर्डे,
      टिळकनगर,नांदेड

      Delete
    2. धन्यवाद, भाऊजी, खूप सुरेख अभिप्राय तुमचा, तुमच्यातही एक लेखक दडलेला आहे, नक्की प्रयत्न करा
      ,,,,,,,,,,,,,,,,मोहिनी

      Delete
  2. खूप सुंदर लिहिले मोहीनी
    देवाच्या अस्तित्वाची जाणीव ..खूप छान करून दिलीस तू ...तुझ्या लेखणातुन
    वैशाली जोशी ..खोडवे....

    ReplyDelete
  3. खूपच छान ... भावनिक लिखाण ...jyoti

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी ताई
      .......मोहिनी

      Delete
  4. छान मांडणी. सुंदर लिखाण.

    ReplyDelete
  5. मोहिनी खुप सुंदर लिखाण

    ReplyDelete
  6. मन अधीर झाले....
    मनाची आधीरता,व्याकुळता समर्थपणे व्यक्त केली.

    ReplyDelete
  7. वारी साठी व्याकुळ झालेल्या मनाची व्यथा
    छान अतिशय सुरेख मांडले
    Keep it up dear 👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  8. एका निस्सीम माऊली भक्ताच्या जीवनाचे दर्शन घडले.. उत्तम लिखाण keep it up..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

आरसा मनाचा

शब्दपर्ण